Saturday, December 30, 2023

विज्ञान प्रसाराशी संबंधित भारतातील आव्हाने -२ (स्त्री सहभागाचे महत्व )

 मागील लेखात आपण विज्ञान प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आणि ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे पाहिले. वैज्ञानिक संशोधनासाठी सरकारकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे पुढील आर्थिक वाढ कशी होऊ शकते, हे देखील आपण थोडक्यात समजून घेतले. शेवटच्या भागात आपण शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावर विज्ञानाचा प्रसार का करावा आणि उल्लेख केलेल्या काही आव्हानांसह एखादी व्यक्ती या सामाजिक कार्यात कसे योगदान देऊ शकते, हे पाहिले.

समाजात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारावर परिणाम करणारे आणखी काही महत्वाचे घटक आहेत, उदाहरणार्थ: सरकारी अनास्था, महिला - वंचित समुदाय यांच्या सहभागाचा अभाव, अयोग्य शैक्षणिक पद्धती, अंमलबजावणीमधल्या त्रुटी वगैरे. या लेखात आपण विज्ञान आणि विज्ञान प्रसारातील महिलांचा घटक पाहू.

भारताच्या (आणि जगाच्या) एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या स्त्रिया आहेत. हे प्रमाण राज्यानुसार बदलत असले तरी, सर्वसाधारण सरासरी म्हणून कोणीही निदान असे म्हणू शकतो. किमान विसाव्या शतकात आणि त्यापूर्वीच्या काळात, जगाला माहीत असलेले शास्त्रज्ञ बहुतेक पुरुष आहेत. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांमध्ये वैज्ञानिक संशोधनासाठी आवश्यक असलेली बौद्धिक क्षमता नव्हती, परंतु तुम्हाला त्यांची नावे त्या आदर्शांमध्ये दिसत नाहीत? का?

आपल्याला यात सुधारणा हवी असेल, तर आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रात अधिक महिला आणण्यासाठी विशेष पाऊले उचलण्याची गरज आहे जेणेकरून STEM नोकऱ्यांमध्ये, परिषदांमध्ये आणि विशेषत: महत्वाच्या पदांवर महिलांचा लक्षणीय सहभाग असणे हे नेहमीचे दृश्य होईल. ही समस्या बहुविध आहे, ज्यामध्ये पारंपारिक लिंग-विशिष्ट भूमिका, लैंगिक पक्षपाती सामाजिक नियम, सांस्कृतिक प्रथा, अहेतुपुरस्सर पूर्वग्रह (स्त्री आणि पुरुष दोघांचेही) इत्यादी अनेक पैलूंचा समावेश आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार खूप उशीरा मिळाला, म्हणजे भारतात सुमारे एक ते दोन शतकांपूर्वी आणि पश्चिमेत त्याहून थोडासा आधी, परंतु तसा तुलनेने अलीकडील. त्यामुळे स्त्री शास्त्रज्ञ ही संकल्पना जनमानसात स्वाभाविकपणे डोळ्यासमोर येत नाही. म्हणजे, आपल्या चित्रपटांत, जाहिरातींत, कथा-कादंबरींमध्ये आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून दिसणारे पात्र बहुतेक पांढरा कोट घातलेला, झुडूप-केसांचा, प्रसंगी विक्षिप्त पण "पुरुष" असतात. (काही निवडक अपवादांसह)
तथापि, गेल्या शतकात, स्त्रियांनी केवळ विज्ञानाचा अभ्यासच केला नाही तर वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातही योगदान देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यापैकी काही त्यांच्या कामासाठी ओळखल्या गेल्या आहेत जसे की: ______ (येथे तुम्हाला माहित असलेल्या पाच महिला वैज्ञानिकांची नावे भरा, करू शकता का?) 



अण्णा मोदयील मणी: भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिकांपैकी एक अण्णा मणी यांना त्यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त Google ने केलेले हे  डूडल. त्यांचा जन्म 1918 - केरळ मध्ये. त्या एक भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी भारतीय हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक म्हणूनही काम केले आहे.


भारतीय संदर्भात नक्कीच अशा महिला आहेत ज्यांनी विज्ञान क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे.[1] भारतातल्या विज्ञान क्षेत्रातून डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमला सोहोनी आणि त्यांना भारतीय विज्ञान संस्थान (IISc) बंगलोर येथे प्रवेश मिळण्याकरिता करावा लागणार संघर्ष [2] एकीकडे आणि आज मोठ्या संख्येने स्त्रिया विज्ञानात डॉक्टरेट मिळवून संशोधन क्षेत्रात काम करताना दिसतात. हा बदल निश्चित स्वागतार्ह आहे पण आपण यावर समाधानी व्हावे का? 

सर्वसाधारण घरामध्ये हल्ली मुलगा किंवा मुलगी यांना दोघानांही शिक्षणाची समसमान संधी दिली जाते. निदान शहरी आणि मध्यमवर्गीय गटात तरी. श्रमजीवी, अल्पउत्पन्न किंवा ग्रामीण, दुर्गम भागात बहुतांशी मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न अजूनही गंभीर आहे कारण त्यांची सामाजिक स्थिती म्हणावी तितकी बदललेली नाही. पण तरी निदान दहावीपर्यंत मुलींच्या शिक्षणाला आजच्या काळात तरी आडकाठी नाही असे आकडे सांगतात. उदा : २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरता टक्केवारी साधारण ८३% आहे, त्यात पुरुषांचे साधारण ९०% आणि स्त्रियांचे साधारण ७५% आहे. संपूर्ण भारताचे एकूण साक्षरता प्रमाण साधारण ७४% आहे, त्यात पुरुषांचे साधारण ८२% आणि स्त्रियांचे साधारण ६४% आहे. सर्वात कमी एकूण साक्षरता उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यात ६३-६९% तर त्याच राज्यात स्त्रियांचे साक्षरता प्रमाण ५३-५७% आहे. देशातील सर्वात कमी स्त्री साक्षरता प्रमाण, राजस्थान मध्ये ५३% पेक्षा थोडेसे कमी आहे. [3]  

एकंदर पुरुष - स्त्री यांच्या साक्षरता प्रमाणात कमालीची तफावत आहे. ती काळासोबत कमी होत असली तरी अजूनही ती आहे यात कुठलेही दुमत नाही. प्रत्येक शैक्षणिक टप्प्यावर, प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, पदवी आणि त्यापुढे; अशा प्रत्येक टप्पयावर ही दरी आणखी रुंदावत जाते. मुलींचे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पाडण्याचे प्रमाणसुद्धा मुलांच्या तुलनेने फार झपाट्याने वाढत जाते. या शिक्षणाचा पुढे मुलींना स्वतंत्र नोकरी-व्यवसाय करायला उपयोग होईल ह्यात शंका नाही.[4]  पण मुलींचे शिक्षण आणि शिक्षणातला लिंगभेद याचे पडसाद आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्याचा कार्यक्रमावर सुद्धा तितक्याच गंभीरतेने पडतात.

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ पुस्तकात शिकवले जाणारे विज्ञान वाचून ते आत्मसात करणे नव्हे किंवा एखादा टेक्निकल प्रोजेक्ट करणे इतकेच नव्हे तर रोजच्या जगण्यात कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवताना किंवा आचरणात आणताना ती तर्कसंगत आहे का? आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर याला सप्रमाण सिद्ध करता येऊ शकते का? हा नीरक्षीर विवेक ठेवणे हे महत्वाचे. समाजातल्या श्रद्धा - अंधश्रद्धा यातल्या धूसर रेषेला ओळखणे आणि त्यांचे वैज्ञानिक खंडन करणे हे देखील महत्वाचे आहे. 

एक स्त्री शिकली तर एक कुटुंब साक्षर होते या महात्मा फुलेंच्या उक्तीप्रमाणे एका स्त्रीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने एका कुटुंबाचा जगण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक होण्यास मदत होते. उदाहरणार्थ: अजूनही भारतीय कुटुंब पध्द्तीमध्ये घरी पाळल्या जाणाऱ्या रूढी-परंपरा आणि पद्धती (स्वयंपाकापासून ते इतर कोणत्याही) या ठरवण्यामध्ये घरातल्या महिलांचा सहभाग मोठा असतो. आई-आज्जी अशा भूमिकांमधून त्या मुलांच्या संगोपनात त्यांची वाढ होताना कोणत्या गोष्टीवर किती आणि कसा विश्वास ठेवायचा याचे संस्कार त्यांच्याही नकळत घालून देत असतात. त्यामुळे जर आईचा दृष्टीकोन वैज्ञानिक असेल तर मुलांचाही तो तसा होण्यास फार मोठी मदत होते. आपल्या रोजच्या जगण्यात मग ते आरोग्याची काळजी असो, आपल्या परिसरातली स्वच्छता असो, जातीभेद - लिंगभेद आणि त्यामुळे येणारे सामाजिक भेदभाव असोत या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीचा दृष्टोकोन हा घरातून निर्माण झालेला आणि प्रभावित झालेला असतो. कालांतराने त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ सुद्धा शकतो पण आपल्या मनात घट्ट बसलेल्या समजुतीच्या विरुद्ध काही ऐकणे, समजून घेणे आणि पटल्यास बदल करणे इतकं मोठं स्थित्यंतर येण्याकरता श्रम घ्यावे लागतात आणि मुळात वैचारिक बदल स्वीकारायला लागणार मोकळेपणा असावा लागतो. आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन या संज्ञेची व्याख्याच मुळात आपण अशीच केली होती की "नवीन ज्ञान, नवीन प्रयोग यांचे स्वागत करण्यासाठी सदैव तत्पर असणारा स्वभाव, जरी त्यांचे परिणाम आपल्या रुढ मत आणि घट्ट समजूतींच्या विरुद्ध असले तरीही ते स्विकारण्याची तयारी असणे."

त्याशिवाय, एखादी नवी माहिती जेव्हा विज्ञान प्रसार करण्याकरता माध्यमांमधून किंवा कार्यक्रमामधून मांडली जाते तेव्हा त्याचा उद्देश ती सर्वांपर्यंत पोहोचणे हा असतो जेणेकरून त्या नव्याने कळलेल्या ज्ञानाची सर्व स्तरातील लोकांना माहिती व्हावी. त्या माहितीचे फायदे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अंधश्रद्धा दूर करणे, रोगांपासून बचाव करणे, नवीन ज्ञानाने तंत्रज्ञानाला चालना देणे, शेती-उद्योग वगैरे करणाऱ्या लोकांना ते आणखी चांगल्या रीतीने करता यावे हे आणि असे अनेकविध फायदे आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनीना विज्ञानात रस निर्माण होऊन संशोधन क्षेत्रात येण्याचे आकर्षण निर्माण होणे, हे ही आहेच. तिथे स्त्रियांच्या सहभागाला महत्व न देण्याने आपण साधारण अर्ध्या समाजाला खिजगणतीतून वजा करण्याचा प्रमाद करण्यासारखे आहे. 

त्यामुळे समाजातील स्त्रियांचे दृष्टिकोन वैज्ञानिक होणे, किंवा त्यांचे प्रबोधन करणे हे सुद्धा भावी पिढीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या उद्देशाने एक गुंतवणूक असते. पण अशा वेळी स्त्रियांचे अशिक्षित किंवा कमी शिक्षित असणे त्याला अनेक अर्थाने अडचणीचे ठरते. म्हणून पहिल्या भागाच्या समारोपात म्हटल्याप्रमाणे भौगोलिक अडथळ्यांमुळे उद्भवणार्‍या आव्हानांच्या सोबतच सामाजिक लिंगभेदाच्या अडथळ्यांमुळे उद्भवणार्‍या आव्हानांच्या संदर्भात, मुख्य प्रवाहात त्यांचे एकीकरण करणे आणि त्यायोगे देशासाठी योगदान देणे ही समाजाच्या तथाकथित सुशिक्षित विज्ञानवादी समाजाची (पुरुष आणि स्त्रिया दोघांची) जबाबदारी बनते.

-डॉ. विनायक कांबळे

सदस्य, इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्सेस (INYAS)
आणि
सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) तिरुवनंतपुरम, केरळ

संदर्भ आणि नोट्स:
1.या विषयावर रोहिणी गोडबोले आणि राम रामास्वामी यांनी संपादित केलेल्या “Lilavathi’s Daughters- यांसारख्या पुस्तकांची वाचकांना शिफारस करत आहे. जरी “भारतीय विज्ञानातील स्त्रियांचे योगदान” ही वाचकाला महत्त्वाची माहिती असली तरी प्राप्त लेखामध्ये तो चर्चेचा मुद्दा नाही आणि म्हणूनच त्या विषयावर पुन्हा केव्हातरी सविस्तर लिहावे लागेल आणि सध्या चर्चेचा मुद्दा म्हणजे विज्ञान प्रसारातील महिलांचा घटक"

 2.https://indianexpress.com/article/explained/everyday-explainers/google-doodle-kamala-sohonie-cv-raman-8671266/

3. https://loksabhadocs.nic.in/Refinput/New_Reference_Notes/English/Girls%20Education%20in%20India.pdf

3. प्रत्यक्षात नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण आपल्याला किती दिसते हे आपण पाहतोच. त्यातही जर जग इतके निष्पक्ष आणि तटस्थ असते, तर प्रत्येक राजकीय आणि प्रशासकीय स्थानावर स्त्रियांचे प्रमाण समसमान रीतीने प्रतिबिंबित झाले असते. दुर्दैवाने तसे नाही.


Wednesday, December 6, 2023

जय भीम!


एका सामान्य माणसामध्ये इतकं बळ कुठून यावं, की पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समाजाच्या पद्धतीविरुद्ध जाऊन असामान्य ऐतिहासिक कामगिरी करायचं?


वर वर गोष्ट सोपी वाटते, पण ती गोष्ट तितकीही सोपी नाही. 

एक आजच्या काळातलं उदाहरणच घेऊ, 
समजा, एका मुलीनं इतर धर्मातल्या मुलाशी लग्न केलं. जर ती मुलगी आधी हिंदू होती आणि तिने मुस्लिम मुलाशी लग्न केलं. (फक्त उदाहरण म्हणून घ्या, हे चांगलं का वाईट याचा खल करणं इथं अपेक्षित नाही) आपण आधी देवाची जशी प्रार्थना करायचो तशी आता करू नये हे तिला सांगितलं जातं. किंवा नाही सांगितलं तरी, असं समजू कि ती मुलगी स्वत:हून मुस्लिम धर्म आत्मसात करू पाहते. तर नमाज पडते वेळी आपल्या श्रद्धेत फार फरक नसतो. ते ही देवाकडे तेच मागत असतात जे आपण नमस्कार करून मागतो. आणि हातांच्या जुळणीत सुद्धा फक्त एकमेकांवर जुळलेले तळवे उघडून  देवाकडे दुवा करायची. पण हे करताना (निदान सुरुवातीला तरी ) तिचे हात थरथरले नाहीत तरच नवल. त्या थरथरण्या हातांमागचं कारण तिच्या श्रद्धेत नसून कुठेतरी आत्मविश्वासातल्या कमतरतेत आहे. 

आजवर आपण जे समजत होतो. जे आचरत होतो ते न करता त्या जागी काहीतरी वेगळं करणं तितकीशी सोपी गोष्ट नाही. साधी तर नाहीच नाही. त्याची मुळं कुठेतरी मनात खोल गेलेली असतात. लहानपणापासून जे मनावर बिंबवलेलं असतं, ते झुगारून द्यायला मुळात काही गोष्टींची नितांत गरज असते. त्यातली मुख्य गोष्ट म्हणजे जे पाहत आलोय, जे बिंबवलय त्याची पराकोटीची चीड किवा त्याचा राग. मग ही चिडच माणसाला ते झुगारून देण्यासाठी लागणारं बळ देते. जर आजच्या पुरोगामी म्हणवणाऱ्या काळात त्या मुलीच्या मनात जर इतका "किंतु" असेल तर साधारण अर्ध्या-पाऊण शतकापूर्वीची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. 

जिथं कळायला लागल्यापासून गावातल्या नाल्यांना साफ करता करता माणसाची मनं त्या घाणीशी बेमालूमपणे एकरूप झालेली असतात, ढोरांना मारून त्यांची चामडी रंगवता-रंगवता त्या उग्र वासानं त्यांची नाकं मेलेली असतात, "जोहर मायबाप" म्हणत गावात महारकी / चांभारकी मागून मिळालेल्या तुकड्याला पोटं सरावलेली असतात, गावातल्या पाण्यापासून देव धर्म सुद्धा शिवता-शिवतीत बांधलेले असतात, तिथं जिणं कसं असेल याचा अंदाज बांधणं, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. कारण आपण हे सगळं अनुभवणं / पाहणं तर सोडाच ते कधी साधं ऐकिवात सुद्धा नसतं. तिथं एखाद्या माणसाला ह्या जिण्याची चीड येणं सहज आणि नैसर्गिक असलं तरी जीव देण्यापुढे किंवा जीव घेण्यापुढे काही विचार करण्याची माणसाची क्षमताच खुंटलेली असते. समाजाने त्याच्या विचारांच्या इतर दिशेला जाणाऱ्या वाटा, अनामिक उंच भिंती घालून अशा काही अडवून धरलेल्या असतात, की त्या पलीकडच्या जगाची तो कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि केलीच तर त्या वाटेवर त्याला दिसते ती त्याची फरफट आणि त्याच्या आप्त स्वकीयांचे हाल. 

जिथं नुसतं चांगलं धडूत जरी अंगावर दिसलं तरी "महार मजला" असं गावात म्हटलं जातं, तिथं शिक्षण घेणं ही त्या माणसाच्या नजरेला क्षितिजापलीकडे असणारी गोष्ट असते. त्यात बाबासाहेबांचं बरिस्टर होण्याला कोणतीही उपमा देण्यासाठी माझ्या नजरेत योग्य उपमान नाही. त्याला धाडसच म्हणावं लागेल. आपल्या मुठभर मावळ्यांना घेऊन अफाट पसरलेल्या यवनी साम्राज्याला ललकारू पाहणाऱ्या शिवाजी महाराजांइतकाच खंबीर निश्चय हवा. (इथं मी कोणाचीही कोणाशी तुलना करू इच्छित नाही. दोघेही महापुरुष माझ्या दृष्टीनं अत्यंत आदरणीय आहेत, आणि कुणाच्या भावना दुखावल्यास क्षमस्व). 

आज बाबासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना माझा नम्र नमस्कार. त्यांनी जे केलंय त्या उपकारातून बाहेर येण्याची या जन्मात तरी संधी नाही. 

वाचकांच्या माहितीसाठी म्हणून सांगू इच्छितो. मी जन्मानं हिंदू चांभार आहे. आमच्या वाड-वडिलांत बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही. पण म्हणून माझ्यावरचे बाबासाहेबांचे उपकार काही कमी होत नाहीत. माझ्या कुटुंबात शिक्षण पहिल्यांदा आलं ते माझ्या वडिलांच्या पिढीत. ते दहावी पर्यंत शिकले. पदवी घेणारा मी घरात पहिलाच. आज इतकं, डॉक्टरेट पर्यंत शिक्षण घेऊ शकलो याला मी बाबासाहेबांचे उपकार मानतो. त्याच बरोबर मला माझ्या जाती बद्दल कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही किंवा अभिमान वगैरे वाटण्याचं तर कारणच नाही. आमचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे आमचा चप्पलचं दुकान. वडील अकाली गेल्या नंतर काकांना मदत म्हणून मी कॉलेज सुटल्यावर तिथे जाऊन त्यांना मदत करायचो. चपलेला टाके वगैरे घालणं हेही शिकलोय. कधीतरी तेही करायचो. पण चप्पल दुरुस्ती हा आमचा मुख्य व्यवसाय नसल्याने ते कधीतरीच व्हायचं. त्या वेळेस B. Sc. ला होतो. तिथेच बसून अभ्यास सुद्धा केला आहे. अगदी M. Sc. पर्यन्त. येत जाता लोक बघत जायचे. फाजील कौतुक म्हणून सांगत नाही. तर त्यांच्यासाठी सांगतोय ज्यांना त्यांची जात सांगायची लाज वाटते. पुढे IISc ला पीएचडी ला प्रवेश घेतला आणि बंगलोर गाठलं तेव्हा ते चपलेचं दुकान सुटलं. 
(सांगण्यासारखं बरंच काही आहे. पुढे-मागे स्वत: बद्दल सांगायची वेळ आली कि सांगायचा प्रयत्न करीन. )

पण एक नक्की की, अजूनही आपली वैचारिक मुळं याच मातीत खोल रुतलेली आहेत. नाही म्हणायला समाज बदलतोय खरा पण कासवाच्या गतीने. अगदी काल मला अनुभव आला की एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुशिक्षित लोक सुद्धा स्वजातीय माणसांसोबत कंपू करायला प्राधान्य देतात. अर्थात हे शहरी - अर्वाचीन भेदभाव सौम्य स्वरूपाचे आणि अंतःस्थ असतात आणि वरकरणी काहीतरी आहारपद्धती, भाषाशुद्धी, चालिरितीतले फरक यांची फुटकळ सबबीच्या आवरणात जपले जातात. ग्रामीण, निम शहरी भागातले प्रकार अजून दिवसा उजेडी घडतात. तिथे एखादयला जातीवरून हाक मारण्यात कुणाला गैर वाटत नाही. दुर्दैवाने ऐकणाऱ्यालाही ते खटकतंय असं चित्र अपवादानेच दिसतं. जातीवादाचा रेषा आखल्या पाहिजेत आणि त्या समजावून सांगितल्या पाहिजेत तथाकथित सवर्णांना आणि दलितांना सुद्धा की अहेतुपुरस्सर भेदभाव (unintentional discrimination) कशाला म्हणतात ? 

असो, मागास वर्गातली शिकलेली लोकं त्यांच्या शिक्षणाचा अजूनही योग्य उपयोग म्हणावा तसं करताना दिसत नाहीत. या शिक्षणाला (फक्त) नोकरी मिळवायचं साधन म्हणून पाहिलं जातंय. तिथंच कदाचित त्या शिक्षणाचं अपयश आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संधीचं सोनं करा इतकंच म्हणणं आहे. 

-डॉ विनायक कांबळे 

Saturday, November 4, 2023

The Challenges of Science Outreach in India -1 (Introduction)

    In a country as large and diverse as India, there are many different types of individuals. Socially, they can be classified into different classes based on caste/tribe, religion, or sect. Economically poor, middle-class, and upper-class, while educationally they can be classified into different classes like uneducated, educated, and highly educated. There is yet another dimension that cuts through all these verticals, i.e. those who have a scientific temper and those who don’t or it could also be those who uphold scientific ideas and those who do not. It would not be wise to say that if a person is uneducated, he/she cannot be progressive enough, similarly, if a person is highly educated it does not guarantee that he/she has a scientific approach. It is certainly not as black and white to draw such a conclusion.

    The same is broadly true about the scientific temper and the scientific dissemination in the country. This is related to the dissemination of scientific concepts/ideas in our society and practicing or believing in those. What's scientific dissemination? A simple Google search yields an answer like scientific dissemination is defined as "the effective communication of scientific knowledge, research findings, and discoveries to a variety of audiences in a clear, accessible, and meaningful manner." Whereas, the term scientific temper is broadly defined as "a temper ever ready to welcome new light, new knowledge, new experiments, even when their results are unfavourable to preconceived opinions and long-cherished theories."[1] So, are the scientific temper and dissemination of science two sides of the same coin? Our entire Indian society is engulfed by the basic ignorance about science and the lack of scientific perspective that comes from it, and the ignorance that brings about the lack of scientific perspective again, like a vicious circle.

    The challenges in India related to the scientific approach and dissemination of science include economic, social, educational, science awareness, and usefulness (of science). Each aspect is not only important in itself but becomes an influencing factor for the other aspects to achieve holistic scientific development. It is necessary to do this systematically to bridge the current gap and to drive all-inclusive scientific progress. For example, the method of teaching in the Indian curriculum (school/college) should be more practical, interactive, and self-learning-based. This component is likely to be included in the upcoming National New Educational Policy (NEP 2020) and it is necessary to implement it effectively.

    The economic aspect of scientific development is a big challenge. It is necessary to identify, give priority, and implement them. For instance, funds should be increased to drive scientific innovation, taking examples from countries with relatively comparable GDP and excellent performance in science. Currently, India's economy ranks fifth in the world with a GDP of about $3.4 trillion[2]. Investment in scientific and technological progress plays an important role in accelerating major projects and meeting critical needs. Long-term developments in science, especially the coming era of quantum computing technology, which are expected in the near future, require substantial investment to develop related infrastructure. The government has started the Quantum Mission[3] by funding it, but there is a need to increase the skilled manpower and capacity building in such a way, that in the future our country and its science can have a big stake in the world science. Besides, such incentives lead to industrial growth based on technology-based innovations and fulfill social needs by creating innovations. Therefore, in the calls related to science reform in the country, the economic component or its economic aspect is unquestionably important.

Let us see its social aspect as well.
    I enjoy being an active participant in programs related to science dissemination, especially when they involve scientific curiosity, research awareness, and educational development. Therefore, science awareness programs from high schools and colleges on better health services, aware citizens, collective fight against pandemics, improving the quality of education, and environmental protection are some of the various causes that are crucial from the scientific temper and science dissemination. Building scientific awareness and career opportunities in science among school and college children should be the prime objective because they are the ones who will be leading the future society. Awareness campaigns and special educational/social initiatives should be undertaken to spread scientific knowledge at various levels of society such as schools, college students, teachers, the general public, and underprivileged communities.

    What can I do at the individual level? - Visiting nearby schools or providing educational assistance to economically or socially weaker sections. For example: introducing them to new internet-based learning methods is possible. Or by giving my time to teach them and help them better learn which their parents are unable to do, or it may be happening at the school. However, such efforts need consistency. Offering intellectual help to such people/students, by interacting with them and providing them educational help. In such economically weak and/or socially deprived communities, first of all, education is not given its due importance, on the contrary, it is often considered useless. Therefore, the biggest challenge is to first impress upon them the importance of education and then to teach them about science. Language is the main factor in such various ventures. That's why outsiders who speak a different language (or perhaps the same but polished language) are aliens in front of such a group and limit communication. If someone could speak to them in their everyday language, offering better understanding, it would help in overcoming the barriers due to language.

    Science dissemination means opening the doors of science to public: to school students and laymen. The challenges arising due to language or geographical barriers, the challenges that prevail due to lack of education, and the challenges that exist due to misconceptions prohibit the people from merging in the mainstream and contributing to the country.


-Dr. Vinayak Kamble
Assistant Professor, School of Physics, IISER Thiruvananthapuram.
Member, Indian National Young Academy of Sciences, New Delhi.

References
[1] Diggle, John (1898). Nicoll, W. Robertson (ed.). The Faith of Science. The Expositor (Fifth Series). Vol. VII. London: The Expositor. pp. 451–452 via Wikipedia
[2] https://timesofindia.indiatimes.com/business/30-trillion-economy-document-to-outline-reforms-pitch/articleshow/104806581.cms?from=mdr
[3] https://dst.gov.in/national-quantum-mission-nqm






Tuesday, October 31, 2023

विज्ञान प्रसाराशी संबंधित भारतातील आव्हाने- 1(परिचय)

भारतासारखा आकाराने आणि विविधतेने विशाल असा देशामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. त्यांना सामाजिक दृष्ट्या जाती/जमाती, धर्म, संप्रदाय आणि आर्थिकदृष्ट्या गरीब, मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय तसेच शैक्षणिकदृष्ट्या अशिक्षित, सुशिक्षित, उच्चशिक्षित अशा वेगवेगळ्या वर्गात वर्गीकरण करता येऊ शकते. या सर्व वर्गीकरणाला छेदून जाणारा आणखी एक आयाम म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे आणि नसणारे.. तसेच रोजच्या जगण्यात त्याचा अवलंब करणारे आणि न करणारे असे सुद्धा करता येऊ शकते. एखादी व्यक्ती अशिक्षित आहे म्हणजे ती व्यक्ती पुढारलेल्या विचारांची नाही असा अर्थ काढणे आणि उच्चशिक्षित आहे म्हणून व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी आहे असा सरसकट समज काढणं इतके ते काळे पांढरे नक्कीच नाही.

तशीच काहीशी अवस्था आपल्या देशात विज्ञानाच्या प्रसारासंदर्भात आहे. विज्ञानाचा प्रसार म्हणजे काय? Google वर शोधल्यास असे उत्तर मिळते की वैज्ञानिक प्रसार म्हणजे "वैज्ञानिक ज्ञान, संशोधन निष्कर्ष आणि शोधांना स्पष्ट, समजायला सोप्या आणि अर्थपूर्ण रीतीने विविध लोकांपर्यंत पोहोचवणे." तर, वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दाची व्यापक व्याख्या "नवीन ज्ञान, नवीन प्रयोग यांचे स्वागत करण्यासाठी सदैव तत्पर असणारा स्वभाव, जरी त्यांचे परिणाम आपल्या रुढ मत आणि घट्ट समजूतींच्या विरुद्ध असले तरीही ते स्विकारण्याची तयारी असणे."[1] किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाचा प्रसार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या एकूण भारतीय समाजात विज्ञानाविषयी असलेलं अज्ञान आणि त्यातून येणारा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि पुन्हा दृष्टिकोनाच्या अभावातून येणारं अज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी एका दुष्टचक्राप्रमाणे निगडित आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाच्या प्रसाराशी संबंधित भारतातील आव्हानांमध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान जागरुकता आणि त्याची उपयुक्तता या बाबींचा समावेश होतो. प्रत्येक पैलू केवळ स्वतःच महत्त्वाचा नसतो तर सर्वांगीण वैज्ञानिक विकास साधण्यासाठी इतर पैलूंसाठी आवश्यक घटक बनतो. सध्याची तफावत भरून काढण्यासाठी आणि सर्वसमावेशक वैज्ञानिक प्रगतीला चालना देण्यासाठी, ते पद्धतशीरपणे करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, भारतीय अभ्यासक्रमातील (शाळा/महाविद्यालये) शिकवण्याची पद्धत अधिक व्यावहारिक, परस्परसंवादी आणि स्वयं-शिक्षण आधारित असावी. आगामी राष्ट्रीय नव्या शैक्षणिक धोरणा (NEP 2020) मध्ये या घटकांचा समावेश करण्यात आला आहे आणि आता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

वैज्ञानिक विकासाचे आर्थिक पैलू हे एक मोठे आव्हान आहे. त्यांना ओळखणे, प्राधान्य देणे आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी, तुलनेने दरडोई उत्पन्न (जीडीपी) आणि विज्ञानातील उत्कृष्ट कामगिरी असलेल्या देशांचे उदाहरण घेऊन निधी वाढवला पाहिजे. सध्या, भारताची अर्थव्यवस्था सुमारे $3.4 ट्रिलियनच्या GDPसह जगातील पाचव्या क्रमांकावर आहे.[2] वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमधील गुंतवणूक मोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि गंभीर गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. विज्ञानातील दीर्घकालीन विकास, विशेषत: क्वांटम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाच्या आगामी युगात, जे नजीकच्या भविष्यात अपेक्षित आहे, संबंधित पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भरीव गुंतवणूक आवश्यक आहे. सरकारने क्वांटम मिशन [3] निधी देऊन सुरू केले हे खरे आहे पण त्याला योग्य पाठबळ आणि क्षमता वाढवण्याची गरज आहे. तसे झाले तरच भविष्यात आपल्या देशाचा आणि त्याच्या विज्ञानाचा जगभरात मोठा वाटा असू शकतो. शिवाय, अशा प्रोत्साहनांमुळे अनवधानाने संलग्न तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक वाढ होते आणि नवीन संशोधन निर्माण करून सामाजिक गरजा पूर्ण होतात. म्हणून, देशांतर्गत विज्ञान संशोधनाशी संबंधित आव्हानांमध्ये, आर्थिक घटक किंवा त्याचा आर्थिक पैलू निर्विवादपणे महत्त्वपूर्ण आहे.

आता त्याचा सामाजिक पैलू पाहू.

मला वैयक्तिकरित्या विज्ञान प्रसारा संदर्भातील कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास आनंद मिळतो, विशेषत: जेव्हा त्यात वैज्ञानिक कुतूहल, संशोधन जागरूकता आणि शैक्षणिक विकास यांचा समावेश असतो. त्यामुळे हायस्कूल आणि कॉलेजांपासून ते विज्ञान जागरुकता कार्यक्रम, चांगली आरोग्य सेवा, जागरूक नागरिक, जागतिक साथीच्या रोगांविरुद्ध एकत्रित लढा, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि पर्यावरण संवर्धन ही काही विविध कारणे आहेत जी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान प्रसाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानतात. शालेय आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये वैज्ञानिक जागरूकता आणि वृत्ती निर्माण करणे हे मुख्य ध्येय असले पाहिजे कारण ते भविष्यातील समाजाची दिशा ठरवणार आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, सामान्य जनता आणि वंचित समुदाय अशा समाजाच्या विविध स्तरांमध्ये वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जागरूकता मोहिमा आणि विशिष्ट शैक्षणिक/सामाजिक उपक्रम हाती घेतले पाहिजेत.

वैयक्तिक स्तरावर आपण काय करू शकतो? - जवळच्या शाळांना भेट देणे किंवा आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक सहाय्य देणे. उदाहरणार्थ: त्यांना इंटरनेटवर आधारित नवीन शिक्षण तंत्रांचा परिचय करून देणे इ. शक्य आहे. आपला वेळ देऊन त्यांना शिकवणे जे त्यांचे पालक करू शकत नाहीत आणि त्यांच्या शाळेत कदाचित केले जात नाही. पण अशा प्रयत्नांना सातत्य हवे. अशा लोकांचा पाठपुरावा करावा, त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांना शैक्षणिक मदत करावी. अशा आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा वंचित किंवा दुर्लक्षित समाजात प्रथमतः शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नाही, उलट बऱ्याचदा ते निरर्थक मानले जाते. त्यामुळे प्रथम त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि नंतर त्यांना विज्ञानाबद्दल सांगणे हीच मोठी आव्हाने आहेत. अशा वेगवेगळ्या उपक्रमात मुख्य अडसर ठरतो तो भाषेचा. त्यामुळे कुणा परगावाहून येऊन वेगळी (कदाचित पॉलिश्ड) भाषा बोलणाऱ्या व्यक्ती समोर अशी मंडळी बुजरी होतात. जर त्यांच्यापैकीच कुणी त्यांच्या रोजच्या भाषेत बोलून या गोष्टी समजावल्यास त्यांचा भाषेचा न्यूनगंड आणि अडसर दूर होण्यास मदत होते.

विज्ञान प्रसार म्हणजे शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिक या दोहोंसाठी सार्वजनिकरित्या विज्ञानाची दालने उघडणे हे अभिप्रेत आहे. भाषा किंवा भौगोलिक अडथळ्यांमुळे उद्भवणार्‍या आव्हानांच्या संदर्भात, मुख्य प्रवाहात त्यांचे एकीकरण करणे आणि देशासाठी योगदान देणे ही समाजाच्या तथाकथित सुशिक्षित / प्रगत आणि पुढारलेल्या इतरांची जबाबदारी बनते.

क्रमश:- 


-डॉ. विनायक कांबळे

सदस्य, इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्सेस (INYAS)
आणि
सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) तिरुवनंतपुरम, केरळ


संदर्भ
[1] Diggle, John (1898). Nicoll, W. Robertson (ed.). The Faith of Science. The Expositor (Fifth Series). Vol. VII. London: The Expositor. pp. 451–452 via Wikipedia
[2] https://timesofindia.indiatimes.com/business/30-trillion-economy-document-to-outline-reforms-pitch/articleshow/104806581.cms?from=mdr