मागील लेखात आपण विज्ञान प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आणि ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे पाहिले. वैज्ञानिक संशोधनासाठी सरकारकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे पुढील आर्थिक वाढ कशी होऊ शकते, हे देखील आपण थोडक्यात समजून घेतले. शेवटच्या भागात आपण शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावर विज्ञानाचा प्रसार का करावा आणि उल्लेख केलेल्या काही आव्हानांसह एखादी व्यक्ती या सामाजिक कार्यात कसे योगदान देऊ शकते, हे पाहिले.
समाजात विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारावर परिणाम करणारे आणखी काही महत्वाचे घटक आहेत, उदाहरणार्थ: सरकारी अनास्था, महिला - वंचित समुदाय यांच्या सहभागाचा अभाव, अयोग्य शैक्षणिक पद्धती, अंमलबजावणीमधल्या त्रुटी वगैरे. या लेखात आपण विज्ञान आणि विज्ञान प्रसारातील महिलांचा घटक पाहू.
भारताच्या (आणि जगाच्या) एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या स्त्रिया आहेत. हे प्रमाण राज्यानुसार बदलत असले तरी, सर्वसाधारण सरासरी म्हणून कोणीही निदान असे म्हणू शकतो. किमान विसाव्या शतकात आणि त्यापूर्वीच्या काळात, जगाला माहीत असलेले शास्त्रज्ञ बहुतेक पुरुष आहेत. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांमध्ये वैज्ञानिक संशोधनासाठी आवश्यक असलेली बौद्धिक क्षमता नव्हती, परंतु तुम्हाला त्यांची नावे त्या आदर्शांमध्ये दिसत नाहीत? का?
आपल्याला यात सुधारणा हवी असेल, तर आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रात अधिक महिला आणण्यासाठी विशेष पाऊले उचलण्याची गरज आहे जेणेकरून STEM नोकऱ्यांमध्ये, परिषदांमध्ये आणि विशेषत: महत्वाच्या पदांवर महिलांचा लक्षणीय सहभाग असणे हे नेहमीचे दृश्य होईल. ही समस्या बहुविध आहे, ज्यामध्ये पारंपारिक लिंग-विशिष्ट भूमिका, लैंगिक पक्षपाती सामाजिक नियम, सांस्कृतिक प्रथा, अहेतुपुरस्सर पूर्वग्रह (स्त्री आणि पुरुष दोघांचेही) इत्यादी अनेक पैलूंचा समावेश आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार खूप उशीरा मिळाला, म्हणजे भारतात सुमारे एक ते दोन शतकांपूर्वी आणि पश्चिमेत त्याहून थोडासा आधी, परंतु तसा तुलनेने अलीकडील. त्यामुळे स्त्री शास्त्रज्ञ ही संकल्पना जनमानसात स्वाभाविकपणे डोळ्यासमोर येत नाही. म्हणजे, आपल्या चित्रपटांत, जाहिरातींत, कथा-कादंबरींमध्ये आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून दिसणारे पात्र बहुतेक पांढरा कोट घातलेला, झुडूप-केसांचा, प्रसंगी विक्षिप्त पण "पुरुष" असतात. (काही निवडक अपवादांसह)
तथापि, गेल्या शतकात, स्त्रियांनी केवळ विज्ञानाचा अभ्यासच केला नाही तर वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातही योगदान देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यापैकी काही त्यांच्या कामासाठी ओळखल्या गेल्या आहेत जसे की: ______ (येथे तुम्हाला माहित असलेल्या पाच महिला वैज्ञानिकांची नावे भरा, करू शकता का?)
अण्णा मोदयील मणी: भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिकांपैकी एक अण्णा मणी यांना त्यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त Google ने केलेले हे डूडल. त्यांचा जन्म 1918 - केरळ मध्ये. त्या एक भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी भारतीय हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक म्हणूनही काम केले आहे.
भारतीय संदर्भात नक्कीच अशा महिला आहेत ज्यांनी विज्ञान क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे.[1] भारतातल्या विज्ञान क्षेत्रातून डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमला सोहोनी आणि त्यांना भारतीय विज्ञान संस्थान (IISc) बंगलोर येथे प्रवेश मिळण्याकरिता करावा लागणार संघर्ष [2] एकीकडे आणि आज मोठ्या संख्येने स्त्रिया विज्ञानात डॉक्टरेट मिळवून संशोधन क्षेत्रात काम करताना दिसतात. हा बदल निश्चित स्वागतार्ह आहे पण आपण यावर समाधानी व्हावे का?
सर्वसाधारण घरामध्ये हल्ली मुलगा किंवा मुलगी यांना दोघानांही शिक्षणाची समसमान संधी दिली जाते. निदान शहरी आणि मध्यमवर्गीय गटात तरी. श्रमजीवी, अल्पउत्पन्न किंवा ग्रामीण, दुर्गम भागात बहुतांशी मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न अजूनही गंभीर आहे कारण त्यांची सामाजिक स्थिती म्हणावी तितकी बदललेली नाही. पण तरी निदान दहावीपर्यंत मुलींच्या शिक्षणाला आजच्या काळात तरी आडकाठी नाही असे आकडे सांगतात. उदा : २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरता टक्केवारी साधारण ८३% आहे, त्यात पुरुषांचे साधारण ९०% आणि स्त्रियांचे साधारण ७५% आहे. संपूर्ण भारताचे एकूण साक्षरता प्रमाण साधारण ७४% आहे, त्यात पुरुषांचे साधारण ८२% आणि स्त्रियांचे साधारण ६४% आहे. सर्वात कमी एकूण साक्षरता उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यात ६३-६९% तर त्याच राज्यात स्त्रियांचे साक्षरता प्रमाण ५३-५७% आहे. देशातील सर्वात कमी स्त्री साक्षरता प्रमाण, राजस्थान मध्ये ५३% पेक्षा थोडेसे कमी आहे. [3]
एकंदर पुरुष - स्त्री यांच्या साक्षरता प्रमाणात कमालीची तफावत आहे. ती काळासोबत कमी होत असली तरी अजूनही ती आहे यात कुठलेही दुमत नाही. प्रत्येक शैक्षणिक टप्प्यावर, प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, पदवी आणि त्यापुढे; अशा प्रत्येक टप्पयावर ही दरी आणखी रुंदावत जाते. मुलींचे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पाडण्याचे प्रमाणसुद्धा मुलांच्या तुलनेने फार झपाट्याने वाढत जाते. या शिक्षणाचा पुढे मुलींना स्वतंत्र नोकरी-व्यवसाय करायला उपयोग होईल ह्यात शंका नाही.[4] पण मुलींचे शिक्षण आणि शिक्षणातला लिंगभेद याचे पडसाद आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्याचा कार्यक्रमावर सुद्धा तितक्याच गंभीरतेने पडतात.
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ पुस्तकात शिकवले जाणारे विज्ञान वाचून ते आत्मसात करणे नव्हे किंवा एखादा टेक्निकल प्रोजेक्ट करणे इतकेच नव्हे तर रोजच्या जगण्यात कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवताना किंवा आचरणात आणताना ती तर्कसंगत आहे का? आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर याला सप्रमाण सिद्ध करता येऊ शकते का? हा नीरक्षीर विवेक ठेवणे हे महत्वाचे. समाजातल्या श्रद्धा - अंधश्रद्धा यातल्या धूसर रेषेला ओळखणे आणि त्यांचे वैज्ञानिक खंडन करणे हे देखील महत्वाचे आहे.
एक स्त्री शिकली तर एक कुटुंब साक्षर होते या महात्मा फुलेंच्या उक्तीप्रमाणे एका स्त्रीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने एका कुटुंबाचा जगण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक होण्यास मदत होते. उदाहरणार्थ: अजूनही भारतीय कुटुंब पध्द्तीमध्ये घरी पाळल्या जाणाऱ्या रूढी-परंपरा आणि पद्धती (स्वयंपाकापासून ते इतर कोणत्याही) या ठरवण्यामध्ये घरातल्या महिलांचा सहभाग मोठा असतो. आई-आज्जी अशा भूमिकांमधून त्या मुलांच्या संगोपनात त्यांची वाढ होताना कोणत्या गोष्टीवर किती आणि कसा विश्वास ठेवायचा याचे संस्कार त्यांच्याही नकळत घालून देत असतात. त्यामुळे जर आईचा दृष्टीकोन वैज्ञानिक असेल तर मुलांचाही तो तसा होण्यास फार मोठी मदत होते. आपल्या रोजच्या जगण्यात मग ते आरोग्याची काळजी असो, आपल्या परिसरातली स्वच्छता असो, जातीभेद - लिंगभेद आणि त्यामुळे येणारे सामाजिक भेदभाव असोत या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीचा दृष्टोकोन हा घरातून निर्माण झालेला आणि प्रभावित झालेला असतो. कालांतराने त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ सुद्धा शकतो पण आपल्या मनात घट्ट बसलेल्या समजुतीच्या विरुद्ध काही ऐकणे, समजून घेणे आणि पटल्यास बदल करणे इतकं मोठं स्थित्यंतर येण्याकरता श्रम घ्यावे लागतात आणि मुळात वैचारिक बदल स्वीकारायला लागणार मोकळेपणा असावा लागतो. आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोन या संज्ञेची व्याख्याच मुळात आपण अशीच केली होती की "नवीन ज्ञान, नवीन प्रयोग यांचे स्वागत करण्यासाठी सदैव तत्पर असणारा स्वभाव, जरी त्यांचे परिणाम आपल्या रुढ मत आणि घट्ट समजूतींच्या विरुद्ध असले तरीही ते स्विकारण्याची तयारी असणे."
त्याशिवाय, एखादी नवी माहिती जेव्हा विज्ञान प्रसार करण्याकरता माध्यमांमधून किंवा कार्यक्रमामधून मांडली जाते तेव्हा त्याचा उद्देश ती सर्वांपर्यंत पोहोचणे हा असतो जेणेकरून त्या नव्याने कळलेल्या ज्ञानाची सर्व स्तरातील लोकांना माहिती व्हावी. त्या माहितीचे फायदे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अंधश्रद्धा दूर करणे, रोगांपासून बचाव करणे, नवीन ज्ञानाने तंत्रज्ञानाला चालना देणे, शेती-उद्योग वगैरे करणाऱ्या लोकांना ते आणखी चांगल्या रीतीने करता यावे हे आणि असे अनेकविध फायदे आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनीना विज्ञानात रस निर्माण होऊन संशोधन क्षेत्रात येण्याचे आकर्षण निर्माण होणे, हे ही आहेच. तिथे स्त्रियांच्या सहभागाला महत्व न देण्याने आपण साधारण अर्ध्या समाजाला खिजगणतीतून वजा करण्याचा प्रमाद करण्यासारखे आहे.
त्यामुळे समाजातील स्त्रियांचे दृष्टिकोन वैज्ञानिक होणे, किंवा त्यांचे प्रबोधन करणे हे सुद्धा भावी पिढीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या उद्देशाने एक गुंतवणूक असते. पण अशा वेळी स्त्रियांचे अशिक्षित किंवा कमी शिक्षित असणे त्याला अनेक अर्थाने अडचणीचे ठरते. म्हणून पहिल्या भागाच्या समारोपात म्हटल्याप्रमाणे भौगोलिक अडथळ्यांमुळे उद्भवणार्या आव्हानांच्या सोबतच सामाजिक लिंगभेदाच्या अडथळ्यांमुळे उद्भवणार्या आव्हानांच्या संदर्भात, मुख्य प्रवाहात त्यांचे एकीकरण करणे आणि त्यायोगे देशासाठी योगदान देणे ही समाजाच्या तथाकथित सुशिक्षित विज्ञानवादी समाजाची (पुरुष आणि स्त्रिया दोघांची) जबाबदारी बनते.
-डॉ. विनायक कांबळे
सदस्य, इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्सेस (INYAS)आणि
सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) तिरुवनंतपुरम, केरळ
संदर्भ आणि नोट्स:
1.या विषयावर रोहिणी गोडबोले आणि राम रामास्वामी यांनी संपादित केलेल्या “Lilavathi’s Daughters- यांसारख्या पुस्तकांची वाचकांना शिफारस करत आहे. जरी “भारतीय विज्ञानातील स्त्रियांचे योगदान” ही वाचकाला महत्त्वाची माहिती असली तरी प्राप्त लेखामध्ये तो चर्चेचा मुद्दा नाही आणि म्हणूनच त्या विषयावर पुन्हा केव्हातरी सविस्तर लिहावे लागेल आणि सध्या चर्चेचा मुद्दा म्हणजे विज्ञान प्रसारातील महिलांचा घटक"
2.https://indianexpress.com/article/explained/everyday-explainers/google-doodle-kamala-sohonie-cv-raman-8671266/
3. https://loksabhadocs.nic.in/Refinput/New_Reference_Notes/English/Girls%20Education%20in%20India.pdf
3. प्रत्यक्षात नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण आपल्याला किती दिसते हे आपण पाहतोच. त्यातही जर जग इतके निष्पक्ष आणि तटस्थ असते, तर प्रत्येक राजकीय आणि प्रशासकीय स्थानावर स्त्रियांचे प्रमाण समसमान रीतीने प्रतिबिंबित झाले असते. दुर्दैवाने तसे नाही.
No comments:
Post a Comment