Sunday, March 8, 2026

शिक्षण, नोकरी आणि न सापडलेलं समाधान

शैक्षणिक गुणवत्ता म्हणजे केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळवणे नाही." -याची जाणीव होईपर्यंत फार उशीर होतो.. वेळ निघून गेलेली असते. ती जाणीव पाल्याला आधी होते आणि मग पालकांना.. बऱ्याच पालकांना ती होतही नाही.

मुलांच्या मार्कशीटला लोकांनी पालकांची सामाजिक प्रतिष्ठा बांधली आणि त्या प्रतिष्ठेचं ओझं दप्तरासोबत मुलांच्या पाठीवर लादलं. परीक्षेतील मार्क हे पालकांचं इतिकर्तव्य आणि मुलांची हुशारी मोजण्याच एकक झाले. कौतुक आणि हेटाळणीला कारण ठरले आणि शिक्षणाचा हेतू मागे पडला. मग मार्क मिळवून देण्याची हमी देणारे ट्युशनवाले आले आणि त्यांनी या सगळ्याची सामाजिक वहिवाट पाडली. क्लासेस स्टेटस सिम्बॉल झाले, मार्क फक्त आकडे न राहता अटीतटीची लढाई झाले.

काही गोष्टींचं ना कौतुक व्हावं ना हेटाळणी.. अल्पायुषी असतात अशा गोष्टी.. परिक्षेतले मार्क हे त्यातलेच एक.

माणसाच्या विचाराच्या कक्षा त्याने किंवा तिने पाहिलेल्या/ ऐकलेल्या/ अनुभवलेल्या जगाइतक्याच मर्यादित असतात. अशा माणसाला त्या बाहेरचं काही सांगितलं तर एकतर ती व्यक्ती आश्चर्यचकित होते, घाबरते, आनंदून जाते किंवा असे काही असण्याला किंवा होण्यालाच नाकारते. गंमत म्हणजे या विचाराच्या कक्षा फक्त स्वानुभवाने आणि विचार केल्यानेच वाढतात, निव्वळ घोकंपट्टीच्या शिक्षणातून वाढत नाहीत, त्यावर विचार केलेला असावा लागतो.

आपल्याकडचे शिक्षणाचे हे फार मोठे अपयश म्हणावे लागेल कि ते इथल्या सुशिक्षित होऊ घातलेल्या लोकांना सारासार विचार करायला शिकवत नाही. फक्त साक्षर करून सोडते. असे लोक त्यांच्या मर्यादित जगात जगत असतात ज्यात त्यांना हवं ते आणि तितकंच त्यांनी वास्तविकता म्हणून पक्की समजूत करून घेतलेली असते.

एक काळ असा होता की जीवनात उदरनिर्वाह चालवायचा म्हणून नोकरी किंवा एखादा व्यवसाय निवडला जात असे. त्या व्यवसायाचा/नोकरीचा उद्देश तेवढाच मर्यादित होता की जगायला लागणारा आर्थिक आधार मिळवायचा. वैयक्तिक आवड-छंद वगैरे असत पण वैयक्तिक जीवनाचा आणि व्यावसायिक जीवनाचा कुठेच शक्यतो संबंध नसे. फार क्वचितच छंदाचं रूपांतर व्यवसायात व्हायचं. कित्येक मराठी नट-नट्या नोकऱ्या करत करत नाटक -सिनेमे करायचे कारण एक अर्थर्जनाचा शाश्वत पर्याय असावा. पूर्णवेळ व्यावसायिक गायक- नर्तकांनी बऱ्यापैकी आधी सुरुवात केली आणि मग व्यावसायिक खेळाडू सुद्धा होऊ लागले. पण तरी असं करणारे लोक उच्चमध्यम वर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असत. कामगारवस्त्या, निमशासकीय कर्मचारी, घाऊक विक्रेते आणि एकूणच तटपुंजी मासिक उत्पन्न असणाऱ्यांची मुले अशी चैन करायचा विचार सुद्धा करू शकत नव्हते. तथाकथित सुखवस्तू कुटुंबातील पालकांना सुद्धा आपले अपत्य पाच आकडी पगारावर स्थिर स्थावर व्हावे हीच अपेक्षा असायची.

साधारण दोन दशकापासून जॉब सैटिस्फैक्शन नावाची संकल्पना आली. अख्खीच्या अख्खी पिढी बारावी नंतर मिळेल त्या इंजियरिंगला एडमिशन घेऊन डिग्र्या घेऊन बाहेर पडत होती आणि आयटी कंपन्यांमध्ये मिळेल ती जागा पटकावून आधी ट्रेनी म्हणून; आणि मग स्थिर झाल्यावर एका कंपनीतून दुसऱ्या आणि दुसऱ्यातून तिसऱ्या अशा उड्या मारत होती, किंबहुना अजूनही आहे. पालकांचा आग्रह किंबहुना हट्ट असे की "आधी इंजिरनियरिंग कर आणि मग तुला हवं ते कर." त्या वाक्याला बळी पडलेली पिढी पुढे जॉब सैटिस्फैक्शन शोधत राहिली. ऑफिसच्या कामातून - घरच्या जबाबदाऱ्यांतून वेळ मिळाला आणि अजूनही छंदांचे काही अवशेष उरले तर एखाद्याला जमत असे अभिनय, संगीत, खेळ, गिर्यारोहण, फोटोग्राफी, पाककला, कविता, लेखन, चित्र वगैरे वगैरे.

आपण जे काम करतोय ते केवळ नाईलाज म्हणून करतोय आणि त्यात कधीच आपला रस नव्हता, किंवा आता तसुभरही रस उरलेला नाही — ही जाणीव अनेकांना होते; आणि अनेकांना होतही नाही. अशा परिस्थितीत आपल्या हातून काही दैदीप्यमान घडावे, ज्यामुळे समाजाला, कुटुंबाला आणि मुख्यतः स्वतःलाच स्वतःचा अभिमान वाटावा, अशी अपेक्षा किंवा शक्यता फारशी उरत नाही. जॉब सॅटिस्फॅक्शनचं खऱ्या अर्थाने शल्य यातच असतं — जे आपल्याला आवडत होतं, त्याला आपण कित्येक मैल मागे सोडून आलो आहोत.

हल्ली LinkedIn सारख्या व्यासपीठांवर आपला व्यावसायिक जीवनाचा चढता आलेख शेलकी विशेषणांनी मढवून मांडण्याची एक पद्धतच रूढ झाली आहे. प्रत्यक्षात त्या सगळ्याचं मूल्य किती, आणि ते इतरांना किती उल्लेखनीय वाटतं, याबद्दल शंका असतेच. अनेक जण सोशल मीडियावर कुणाच्या शैक्षणिक, सामाजिक किंवा कला क्षेत्रातील यशाचं मनोमन कौतुक करताना स्वतःलाच एक प्रश्न विचारत असतात — “हे आपल्यालाही जमलं असतं का?”

या प्रश्नाचं उत्तर फार अवघड नसतं. ज्या माणसाला धोपटमार्ग सोडून वेगळ्या वळणाने जाण्याची जोखीम घ्यावीशी वाटत नाही आणि जो कायम “tried and tested” वाटेवरच चालत राहतो, त्याच्याकडून काही विलक्षण घडण्याची शक्यता कमीच असते. आणि कदाचित त्याहून मोठी गोष्ट म्हणजे — अशा माणसाला स्वतःच्या कामाचा मनापासून अभिमान वाटण्याची संधीही क्वचितच मिळते