अलीकडे यूट्यूबवर एक पॉडकास्ट व्हिडिओ पाहण्यात आला, इतर अनेक व्हिडिओजपेक्षा हा वेगळा होता कारण यात राजकारण टाळून देशाचं अर्थशास्त्र सांगितलं होतं. तसं तर बराच मोठा होता पण पूर्ण पहावासा वाटला कारण या गोष्टी लोकांना माहीत नसतात. सामान्य माणसांना त्या कळण्याचा मार्ग सुद्धा नसतो आणि प्रचलित शिक्षण पद्धती त्यांची तेवढी कुवत सुद्धा तयार करत नाही.
देशाला लागणारी साधन सामुग्री, त्यांची होणारी आयात, त्यावर होणारा परकीय चलनाचा खर्च, त्यातून आपण किती गोष्टी निर्यात करतो? त्या देवाणघेवाणवर विसंबलेली आपली जीवन पद्धती आणि एकप्रकारे आलेलं परावलंबत्व किंवा वैश्विक महत्व, असा सगळा थोडक्यात प्रवास. "वसुधैव कुटुंबकम" म्हणणाऱ्या मानव जातीला आपला भौगोलिक राजकीय रेषांच्या पलीकडली एकमेकांवर असलेली डिपेंडन्सी ही क्षुल्लक वाटत असली तरी ती रोजच्या जगण्यात किती गरजेची असते आणि बेमालूमपणे मिसळलेली असते याची यत्किंचितही जाणीव नसते. त्याच डिपेंड्सन्सी मधून आयात निर्यातीचं गणित उभं रहातं आणि त्यातून ज्याला आपण चलन म्हणतो ती एक व्यवहार्य संज्ञा तयार होते.
प्राचीन काळातल्या एका गावाचं उदाहरण घ्या, ज्याचा बाहेरच्या इतर गावांशी व्यापार शून्य आहे असा समजा. आता ह्या गावातले बारा बलुतेदार त्यांच्या जगण्यासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत. इतकं हे म्हणावं तर सोपं, म्हणावं तर क्लिष्ट आहे. त्यांना एकमेकांकडे असलेल्या साधनं आणि सेवांकरता हितसंबंध बनवून राखणं क्रमप्राप्त असतं. (त्यातून येणारी भांडवलशाही पुन्हा कधी विचारात घेऊ)
सामान्य माणसाचा भाग सोडा, आमच्या वैज्ञानिक क्षेत्रात याचा इतका मोठा परिणाम किंबहुना हस्तक्षेप असतो आणि त्यातून एक जबाबदारी येते त्याची जाणीव सुद्धा कित्येक वैज्ञानिक म्हणवणाऱ्या मर्त्य मानवांना नसते. त्यांना वाटते आपण आपले वाचन-लेखन-प्रयोग करत राहू आणि या बाहेरच्या गौण जगाशी आपल्याला काय संबंध?
विसाव्या शतकातल्या औद्योगिक रेट्याला खरं बळ जर कुणी दिलं असेल तर ते म्हणजे विज्ञान आणि त्यातून निर्माण होणारं तंत्रज्ञान. त्याचे परिणाम आज आपण सगळीकडे पाहतो. वीज, वाहनं, शेतीतली हरित क्रांती, वैद्यकशास्त्राची प्रगती, संगणक, मोबाईल, इंटरनेट, AI अशी कितीतरी उदाहरणं देता येतील ज्यांच्या द्वारे विज्ञानाने आज आपलं जीवन सुखकर केले आहे. तुम्ही म्हणाल याचा अर्थशास्त्राशी काय संबंध?
तर खूप घनिष्ट संबंध आहे. या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीसाठी बऱ्याच प्रकारची साधनं लागतात आणि सेवा सुद्धा लागतात. यांच्यापैकी कित्तीतरी गोष्टी, कच्चा माल असो किंवा त्याला लागणारी विशेष मूलद्रव्य असोत, आपल्याकडे त्याची उपलब्धता नसते. मग ते सोने असो, सिलिकॉन असो किंवा लिथियम असो. साधारण वीस वर्षा पूर्वी जेव्हा मी पदार्थ विज्ञान्याच्या क्षेत्रात संशोधक होण्यासाठी माझी बाल पावले टाकली तेव्हा अचानक ऊर्जा, शाश्वत विकास (sustainability) वगैरे शब्द कानावर पडले. एखाद्या प्रगत तंत्रज्ञानाला लोक पर्यायी तंत्रज्ञान शोधू लागले होते आणि त्यासाठी निसर्गात ज्यांचा आढळ मुबलक आहे अशा मूलद्रव्यांची निवड करत. मला त्याचा विशेष फायदा कळेना की का तुम्हाला एखाद्या चांगल्या चालणाऱ्या मर्शडीजला बैलगाडीचं चाक लावू पाहत होते? बरं चाललं होतं सिलिकॉनचं, लिथियमचं इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आणि शीस (लेड) चं अणू केंद्रीय ऊर्जा वगैरे क्षेत्रात.. का त्यांच्या जागी दुसरे सुमार मूलद्रव्य हवेत?
पण इथे अर्थशास्त्राचं, भुविज्ञानाचं आणि भांडवलशाहीचं गणित होतं. तसं विज्ञानाचा स्वार्थ सुद्धा होता की यातून काही नवीन हाती लागेल, जे याआधी मानव जातीला माहीत नसेल आणि कदाचित यांची गुणवत्ता-क्षमता वगैरे आपण जास्त मिळवू शकू पण ते सगळं अर्थशास्त्राला तितकं महत्वाचं वाटत नसावं. त्याच्या दृष्टीने सुरुवातीला तांत्रिक दर्जापेक्षा परकीय अवलंबत्व कमी करणं जास्त महत्वाचं होतं/आहे. हे कळायला काही वर्ष लागली.
उर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांना अर्थशास्त्राचे आकडे ओळखीचे असतात. किती वॅट-हावर पर केजी, किती पर डॉलर, किती रुपये, कोणते भूगर्भात आढळणारे मूलद्रव्य किती दुर्मिळ आहे, कोणते पर्यावरणाला घातक आहेत, यांची उत्तर कायम तयार ठेवावी लागतात.
पण त्या सगळ्यातून हवा तो परिणाम दिसतोय का? आपण आहे त्या पद्धतीने विज्ञान करत आणि शिकत राहावं का? आपलं स्वदेशी तंत्रज्ञान आणि विज्ञान आपल्याला या सगळ्यातून सावरायला काही मदत करू शकेल का ? याचा विचार वैज्ञानिक मित्रांनी आणि शिक्षण तज्ञांनी करायला हवा. आणि खास करून येणाऱ्या पुढच्या पिढीने तर नक्कीच करायला हवा. भविष्यातील संशोधक घडवताना विज्ञानाला अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राची जोड देणं ही आता ऐच्छिक गोष्ट राहिलेली नाही; ती काळाची गरज बनली आहे. आणि तिची सुरुवात शालेय शिक्षणातूनच व्हायला हवी.
-डॉ विनायक कांबळे
No comments:
Post a Comment